उमलत्या कळ्या


अवघे सारे मिळूनी

एक काम करूया

उमलत्या कळ्यांना

जीवदान देऊ या !! धृ !!



बाबा तुमची लेक आज

येउद्या जन्माला

उद्याची असेल ती

तुमचीच छाया !! १ !!



नऊ मास उदरात

ठेव मला आई

नको करू मला तू

मारण्याची घाई !!२!!



नऊ मास होताच

येईल जन्माला

विसरणार नाही मी

तुझ्या गं ऋणाला !!३!!



आजीलाही सांग नात

आतुरली भेटीला

नातवासाठी नको तू

छळूस सुनेला !!४!!



शिकून मी होईन

खूप खूप मोठी

काम हि करेल मी

आई तुझ्या साठी !!५!!



आस एक मनामध्ये

दाटून ती आली

घटी भरले अमृत

मुखी माझ्या देई !!६!!



दादासंगे मस्ती मी

घालणार नाही

तुझे म्हणणे सारे मी

ऐकेल गं आई !!७!!



घासातील घास माझ्या

देईल दादाला

मी गेल्यावर राखी कोण

बांधेल दादाला !!८!!



आई बाबा तुम्हाला

सांगणे ते एक

जन्मा येऊ द्या तुमची

अभागी हि लेक !!९!!



अंतरीची हाक तू

जाणून घे आई

उमलत्या कळीला

नको खुडू आई !!१०!!



उमलत्या कळ्यांना

तुम्ही आज खुडता

कशी येईल जन्माला

उद्याची गं माता !!११!!



क्षमा कर बेटी तुझ्या

लाडक्या बाबाला

जीवा पल्याड जपेल मी

माझ्या गं कळीला !!१२!!



लोकप्रिय पोस्ट